मुंबई - मुंबईसह राज्यात गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार होता. हा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोनावरील निर्बंध हटवले आहेत. नागरिकांना मास्क घालणे ऐच्छिक केले आहे. (The Ban On Corona Has Been Lifted) यामुळे मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर आता कारवाई होणार नाही. यासाठी मुंबई महापालिकेने उद्या 1 एप्रिलपासून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दंडात्मक कार्यवाही बंद -जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सन (२०२०)च्या सुरुवातीपासून सुरु झाला होता. मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबवण्याठी वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या आणि विविध निर्णय घेतले होते. तोंडावर मुखपट्टी अर्थात मास्क परिधान केल्याने कोरोना पासून स्वतःचा बचाव होतो. तसेच, प्रसार थांबतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्देश दिल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे महानगरपालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. मास्कचा वापर न केल्यास दंड म्हणून २०० रुपये नागरिकांकडून आकारण्यात येत होते.