मुंबई -आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली आहे. ५ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात उपस्थित राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ( Disha Salian Death Case ) दिशा सालियन प्रकरणी झालेल्या वक्तव्याबाबत दिशाच्या आईने मालाड पश्चिमच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मालवणी पोलीस याच प्रकरणाचा तपास करत आहेत.
पिता-पुत्र दोघेही ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार
या तपासांतर्गत ३ आणि ४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. ( Police summonsed to Narayan Rane ) मात्र, राणे कुटुंबीयांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे आता राणे पिता-पुत्र दोघेही ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
हत्या करण्यात आल्याचा दावा
दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, तर भाजपा आमदार नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. ल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.