मुंबई - मागील महिन्यात कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. यातील नुकसानग्रस्त कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे. तसेच मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.
सदर बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -ईटीव्ही भारत एक्सक्लुसिव्ह : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात कोरोनाबाधित भजनामधून वाढवताहेत मनोबल
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, रायगड रत्नागिरी व सिधुदुर्ग मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे. अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित मदतही तत्काळ देण्यात यावी, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
कोकणात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते वीज पुरवठा मोबाईल कनेक्टीव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरीही यामधील प्रलंबित कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व राज्य शासनाच्या निधीमधून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात रायगड जिल्हासाठी 372 कोटी 97 लाख 16 हजार, रत्नागिरीसाठी 116 कोटी 78 लाख 69 हजार आणि सिधुदुर्गसाठी 37.19 लाख, असे 490 कोटी 13 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.