नीरव मोदीच्या विरोधात त्याच्या बहिणीसह भावोजी देणार साक्ष - Purvi Modi, sister
नीरव मोदी याची बहिण व तिचा पती यांनी विशेष न्यायालयामध्ये नीरव मोदी विरोधात याचिका दाखल केली आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी पासून आम्हाला लांब ठेवण्यात यावे, यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत तपास यंत्रणांना करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई- पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरोधात फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून कारवाई केली जात आहे. ईडी कडून यासंदर्भात नीरव मोदी याच्या विरोधात कारवाई केली जात असताना, नीरव मोदी याची बहिण व तिचा पती यांनी विशेष न्यायालयामध्ये नीरव मोदी विरोधात याचिका दाखल केली आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी पासून आम्हाला लांब ठेवण्यात यावे, यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत तपास यंत्रणांना करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे. नीरव मोदीची बहिण पूर्वी मेहता व तिचा पती मयांक मेहता यांनी ही याचिका ईडी विशेष न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे.
नीरव मोदीमुळे व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात तणाव-
पूर्वी मेहता हिच्याकडे बेल्जियम नागरिकत्व असून तिचा पती मयांककडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमध्ये नीरव मोदी प्रकरणामुळे त्यांच व्यावसायिक आणि खासगी आयुष्य तणावाखाली आल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. नीरव मोदी कडून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात ईडी कडून मनी लाँडरिंग संदर्भात तपास केला जात आहे . या संदर्भात दोन प्रकरणांमध्ये आपण पुरावे देऊन मदत करू शकतो असे या दोघांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.
पूर्वी मेहता आणि मयांक मेहता ईडीच्या गुन्ह्यात सह आरोपी-
नीरव मोदी आणि इतर व्यक्तींच्या विरोधात सीबीआय व ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून नीरव मोदीच्या विरोधात 6498 कोटी रुपयांच्या घोटाळा नोंदविण्यात आलेला आहे. पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 6 हजार 498 कोटी रुपयांचा चुना नीरव मोदी याने लावलेला आहे. पूर्वी मेहता व मयांक मेहता यांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी दाखवण्यात आलेला नाही. मात्र, ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये या दोघांना सह आरोपी दाखवण्यात आलेला आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी या दोघांच्या याचिकेला परवानगी दिली असून अटी शर्तींवर त्यांना यासंदर्भात साक्षीदार होण्यासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना मुळे भारतात येणे शक्य नसल्याचे पूर्वी मेहता व मयांक मेहता यांनी म्हटले आहे. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने आपण आपली साक्ष देऊ असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.