मुंबई - कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून रुग्णांमध्ये आणि मृतांमध्येही ज्येष्ठ नागरिकांचाच मोठ्या संख्येने समावेश आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, पण घाबरून जाण्याची आवश्यकत मात्र मुळीच नाही. कारण 60 ते 100 वर्षापर्यंतचे रुग्णही मोठ्या संख्येने बरे होत असल्याचे आशादायी चित्र आहे. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकही कोरोनाला हरवत असून मुंबईत नुकतीच अशी दोन उदाहरणे समोर आली आहेत. मध्य मुंबईच्या वोक्खार्ट येथील रुग्णालयात नव्वदी पार केलेल्या दोन जणांनी नुकतीच कोरोनावर मात केली. दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.
घनश्यामदास चंचलानी (वय 92) हे पनवेलमध्ये राहतात. त्यांना ताप येत होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू केले. पण तरीही तब्येतीत सुधारत नसल्याने त्यांची कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्या कुटुंबाने तत्काळ त्यांना वोकहार्ट रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांनी न घाबरता उपचारांना प्रतिसाद दिला. त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढत गेली. पुढे संसर्ग कमी झाला आणि आजोबा ठणठणीत बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. तर घरी त्यांना 14 दिवस क्वारंटाइन केले होते. आता त्यांची तब्येत ठीक असल्याने डॉक्टरांनी ते कोरोनातून बरे झाल्याचे सांगितले आहे.