मुंबई -दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक, लेखक नीळकंठ यशवंत खाडिलकर यांचे आज (22 नोव्हेंबर) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स स्थानकासमोर त्यांचा अंत्यसंस्कार विधी केला जाणार आहे. तसेच नवाकाळ कार्यालय खाडिलकर रोड गिरगाव येथे दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
हेही वाचा... प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय
आपल्या तेज लेखणीने गेली ६ दशके सातत्याने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे निळूभाऊ काळाच्या पडद्या आड गेले आहेत. अग्रलेख, प्रॅक्टिकल समाजवाद आणि आपल्या भारधार वक्तृत्वाने निळूभाऊंनी नवाकाळची कीर्ती साता समुद्रापार पोहोचवली. तसेच सामान्य जनतेचा तोफखाना अशी निळूभाऊंची ओळख होती.
हेही वाचा... गुवाहाटी-मुंबई विमानाचे वैद्यकीय आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशाचा मृत्यू, कारण अस्पष्ट
नीळकंठ खाडिलकर यांच्याविषयी थोडक्यात....
नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल १९३४ रोजी झाला. नीळकंठ खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्षे संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केले. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखातकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. तसेच वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून खाडिलकर यांनी जवळपास २७ वर्षे काम केले. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू. ते ‘दैनिक संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. निळूभाऊ खाडिलकरांचं ‘हिंदुत्व’ हे पुस्तक समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरले.
हेही वाचा... राजीव गांधी हत्याकांड : मद्रास उच्च न्यायालयाने दोषी रॉबर्ट पायसला दिली 30 दिवसांची पॅरोल
नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.