मुंबई -वरळी विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या पबमध्ये कोरोनासंदर्भात कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही, असा व्हिडिओ मनसेतर्फे प्रसारित करण्यात आला होता. यानंतर मोठा गोंधळ देखील झाला होता. असाच एक पोलखोल करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. बोरिवलीमधील नाईट क्लबमध्ये कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची सखोल कारवाई व्हावी अशी मागणी मनसे नेते नयन कदम यांनी केली आहे.
हेही वाचा -चार हजार द्या.. निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट घेऊन जा; मानखुर्दमधील लॅबचा प्रकार
कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही
लॉकडाऊनचे नियम आणि अटी पायदळी तुडवले जात असल्याने पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांना पत्र लिहले आहे. डान्सबार आणि हॉटेल्समध्ये नियमांपेक्षा अधिक गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमाचे पालन या ठिकाणी होताना दिसत नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरु असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. यासंबंधी कारवाई व्हावी यासाठी बोरिवली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र लिहिले आहे, असे कदम यांनी सांगितले आहे.
लाखोंच्या नोटा उधळण
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वत्र रात्रीची संचारबंदी लागू आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यासाठी सामान्य जनतेवर
कारवाईचा बडगा उगारत आहे, आणि कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ते योग्यही आहे. मास्क नसेल तर दंड आकारत आहेत. सोशल डिस्टनसिंगच्या नावाने लग्नात ५० च्या वर नातेवाईक नाही, शिवजयंती, मराठी भाषा दिवसही साधेपणाने साजरे करावे लागले, असे कडक निबंध फक्त सामान्य जनतेवरच लागू होत आहेत. पण मुंबईतील नाईट लाईफ मात्र जोरात सुरू आहे. कस्तुरबा पोलीस ठाणे हद्दीत महात्मा गांधी मार्ग आहे, दुर्दैवाने महात्मा गांधी मार्ग हा मुंबईत डान्स बारसाठी कुप्रसिद्ध आहे. सामान्य जनतेच्याननोकऱ्या गेल्या असताना हे डान्स बार मात्र जोरात सुरू आहेत. नोटांची उधळण येथे रोज दिसून येते. एका रात्रीत लाखोंच्या नोटा उधळल्या जातात असेही कदम यांनी सांगितले.