मुंबई :मुंबईत नाईट कर्फ्यू लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी बऱ्याच ठिकाणी याची अंमलबजावणी म्हणावी तितक्या प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तुरळक वाहतूक सुरू होती. दादर परिसरामध्ये काही नागरिकही एकत्र जमलेले दिसून आले. त्यामुळे नाईट कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला बरीच मेहनत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
नव्या कोरोनामुळे खबरदारी..
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात २२ जानेवारीपासून मुंबईसह सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.