मुंबई -मुंबईत रुग्ण संख्या वाढत असली तरी लक्षणे नसलेले ८० टक्के रुग्ण आहेत. यामुळे सध्या लॉकडाऊन किंवा रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार नाही. चाचण्या वाढवल्याने रुग्णवाढ दिसून येत आहे. तरीही पुढील एक आठवडा रुग्णसंख्या वाढीवर लक्ष ठेवून कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. सध्या रुग्णांसाठी खाटा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू तसेच व्हेंटिलेटर बेड तयार ठेवणे, चाचण्या वाढवणे यावर आधी लक्ष केंद्रित करत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
माहिती देताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढ -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. वर्षभरानंतर लॉकडाऊनमध्ये दिलेल्या शिथिलतेनंतर गर्दी वाढू लागल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेले तीन दिवस तीन हजारावर रुग्णसंख्या आढळून आली होती. त्यात वाढ होऊन आज ५१८५ नवे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. मॉल, थियेटर, मार्केट, फेरीवाले, खाऊ गल्ल्या येथे येणारे नागरिक, मुंबई बाहेरून रेल्वे आणि एसटीने येणारे प्रवासी यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा -हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे, तर वाझेंवर 'युएपीए' वाचा आज दिवसभरातील अपडेटस्
रुग्णालयात २२ तर कोरोना सेंटरमध्ये ५० हजार खाटा -
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालय आणि कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालिका रुग्णालय आणि खासगी रुग्णलयात सध्या १४ खाटा उपलब्ध असून त्याची क्षमता २२ हजारावर नेली जाणार आहे. कोरोना सेंटर २ मध्ये ५० हजार खाटा उपलब्ध करण्यात येतील, असे ही त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या ४५ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण होत असून रोज ७५ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात होईल असे काकाणी यांनी सांगितले.
४५ वर्षांवरील व्यक्तींना लस -
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. १ मार्चपासून ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस टोचली जाणार आहे. केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मुंबईत सुमारे ४५ लाखांच्यावर ४५ वर्षांवरील नागरिक असून त्यांना लस टोचण्यासाठी लसीचासाठा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला लस मिळेल याबाबत पालिका प्रशासन नियोजन करत असल्याचे काकाणी म्हणाले.
चौपाट्यांवर अँटीजन चाचणी -
गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता यंदा होळी व रंगपंचमीवर पालिका प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. तसेच रंगपंचमी दिवशी जुहू चौपाटीसह अन्य चौपाट्या, पर्यटनस्थळे या ठिकाणी लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी गर्दी करु नये अशी विनंती करण्यात येईल. पालिकेच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्यास साथ रोग नियंत्रण कायदानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिला आहे. दरम्यान, चौपाट्यांवर येणाऱ्यांची अँटीजेनी चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद; बुधवारी 5185 नवीन कोरोनाबाधित