मुंबई- मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने सांताक्रूझ येथील इंदिरानगरमध्ये केलेल्या कारवाईदरम्यान 175 ग्राम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 21 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
'नायजेरियन आरोपीची मुंबईत मोठी टोळी'
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटला मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुज परिसरातील त्रिपाठी फ्लोअर मिल समोरील इंदिरानगर येथे एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी एक नायजेरियन व्यक्ती संशयास्पदरीत्या पोलिसांना आढळून आला. या आरोपीस ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या हातातील पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पिशवीमध्ये 175 ग्राम एमडी हे अंमली पदार्थ आढळून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चिकू इग्वे (41) असे असून त्याच्याकडून मिळालेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 21 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन आरोपीची मुंबईत मोठी टोळी असून ती एमडी या अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार- नाना पटोले