मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर स्फोटके असणारी कार आढळून आली होती. याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच ही गाडी याठिकाणी ठेवली असा एनआयएला संशय आहे. त्यामुळे, वाझेंना घटनास्थळी नेत एनआयएने शुक्रवारी रात्री उशीरा या संपूर्ण प्रकरणाचे नाट्य रुपांतर केले.
पीपीई किटमधील व्यक्ती वाझेच असल्याच्या खात्रीसाठी प्रयोग..
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एनआयएचे पथक वाझेंना घटनास्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी गाडीमध्ये स्फोटके ठेवण्याच्या घटनेचे नाट्य रुपांतर त्यांच्याकडून करुन घेण्यात आले. याप्रकरणी एनआयएला जो सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला होता, त्यामध्ये गाडीत स्फोटके ठेवणारी व्यक्ती पीपीई किटमध्ये दिसून येत आहे. या किटमध्ये वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे, या घटनेचे नाट्य रुपांतर करण्यात आले. यावेळी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्सही याठिकाणी हजर होते.