महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NIA Investigation : मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रींग प्रकरण, एनआयएकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अटक केलेल्या प्रकरणातच ही छापेमारी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.

NIA Investigation
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 12, 2022, 1:45 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या विरोधात मुंबईमध्ये सोमवारी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती. छापेमारी दरम्यान एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर 18 जणांची एनआयएकडून आज सलग तिसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे या चौकशी दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेला असलेल्या ईडी आणि आयबीच्या अधिकाऱ्यांकडून एनआयएच्या मुख्यालयात चौकशी करण्यात येत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने टाकले होते 29 ठिकाणी छापे -राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती. त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 जणांची चौकशी करण्यात आली आहे.

तिसऱ्या दिवशीही चौकशी सुरू -एनआयएकडून चौकशीच्या थेट तिसऱ्या दिवशी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 जणांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडण्यात आले, तर काही जण अजूनही एनआयए ऑफिसलाच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिकांशी संबंधित प्रकरण -राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अटक केलेल्या प्रकरणातच ही छापेमारी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. दाऊद इब्राहीमच्या फ्रंटमॅनसोबत मलिकांनी व्यवहार केल्याच्या आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली होती.

अतिरेकी कारवायासाठी टेरर फंडींग -दाऊद इब्राहीमशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचे काम करत आहे. दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कारवाया करत असल्याचेही गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. एनआयए फक्त दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनीचीच चौकशी करणार नाही, तर छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित घटनांचाही तपास करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details