मुंबई-मुकेश अंबानी यांच्या ॲन्टिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी मुंबईत पोलीस खात्यात नावाजलेल्या प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. एनआयएने शर्मा यांची साडेआठ तास चौकशी केली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दावा करण्यात आलेला आहे की, मनसुख हिरेन यांचे मोबाईल लोकेशन हे अंधेरी चकाला येथे मिळून आले होते. या ठिकाणी प्रदीप शर्मा यांचे घर असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
मनसुख हिरेन प्रकरण: एनआयएकडून प्रदीप शर्मा यांची चौकशी विनायक शिंदे, मनसुख व सचिन वाझे यांचे मोबाईल लोकेशन प्रदीप शर्माच्या घराजवळ -
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक आरोपी विनायक शिंदे , सचिन वाझें व मनसुख हिरेन या तिघांचे मोबाईल लोकेशन पडताळले असता यामध्ये या तिघांचेही मोबाईल लोकेशन हे अंधेरी चकाला येथे आढळून आले होते. यानंतर याच परिसरामध्ये प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याचे घर असल्यामुळे त्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेला संशय आहे की, प्रदीप शर्मा, सचिन वाझे, विनायक शिंदे व मनसुख हिरेन या चौघांमध्ये एक मीटिंग पार पडलेली होती. या मिटिंगमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली होती, याचा तपास केला जात आहे.
हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्याकडून ज्या 14 सिमकार्डबाबत चौकशी केली जात आहे. त्यातील एक सिमकार्ड हे अंधेरीत बंद केल्याचे तपासात समोर आले आहे. 2 मार्चला सचिन वाझे आणि विनायक शिंदेंनी पश्चिम उपनगरात एक मिटिंग केली होती. असे सांगितले जाते की, हे दोघे शर्मांना भेटायला आले होते. 3 मार्च रोजी सचिन वाझेने पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वाझे पुन्हा अंधेरीला गेले होते. ही भेट देखील शर्मांसोबत होती असे बोलले जाते.
जैश उल हिंद या संघटनेने या गुन्ह्यांची जबाबदारी स्विकारली आणि काही तासात मागेही घेतली. या मागेही शर्मांचा हात असल्याचे बोलले जात आहे. वाजेंच्या अटकेनंतर शर्मा एटीएस कार्यालयातही गेले होते. तसेच त्यांनी परमबीर सिंग यांचीही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या गुन्ह्यात शर्मांचा काही सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी एनआयएने शर्माची चौकशी केल्याचे एनआयए सूत्रांकडून कळते.
'या' युट्युबरची होणार चौकशी -
या बरोबरच युट्युब वर प्रसिद्ध असलेल्या निखील मुंबईकर या यूट्यूबरला सुद्धा चौकशीसाठी लवकरच समन्स पाठवले जाणार आहे. याचे कारण म्हणजे अटक आरोपी सचिन वाझे याने निखील मुंबईकर याच्यासोबत लडाख या ठिकाणी स्पोर्ट्स बाईक वरून प्रवास केलेला होता. या दरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ सुद्धा युट्युब वर पोस्ट करण्यात आलेला होता. निखील मुंबईकर हा सचिन वाझे याच्या चांगला परिचयातील असून त्याचा जवळचा मानला जात आहे. त्यामुळे निखील मुंबईकरला सचिन वाझेबद्दल आणखीन काही माहिती आहे का, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.
हेही वाचा-मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेला जगण्या-मरण्याचा प्रश्न समजू नका