मुंबई - अँटिलिया कार स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आज एनआयए कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सचिन वाझेच्या वकीलांकडून युक्तीवाद करण्यात आला. प्रकृती अस्वस्थेमुळे वाझेवर खासगी रुग्णालायत उपचार करण्यासाठी वकीलाकडून उच्च न्यायालयात परवानगी मागितली. वाझेच्या वकिलांनी कोकिलाबेन, सुराना किंवा सेफी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मागितली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी सचिन वाझेला फटकारले -
सुनावणी दरम्यान सुनील माने आणि सचिन वाझे हे दोघे हजर होते. हे दोघे आपापसात बोलण्याचा प्रयत्न करत होते. हे न्यायाधीशांच्या ध्यानात येताच त्या दोघांना न्यायाधीशांनी फटकारले आणि दोघांना आरोपीच्या जागेवर बसण्यास पाठवले.
एनआयएने सचिन वाझे याची दोन दिवसांची आणि सुनील माने याची चार दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर 30 दिवसांची कोठडी देण्यात येत असते. वाझेची 28 दिवसांची कोठडी पूर्ण झाली आहे तर दोन दिवसांची कोठडी बाकी आहे. तर मानेची 14 दिवसांची पूर्ण झाली आहे. म्हणून मानेच्या 4 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.
सचिन वाझे याच्यावर ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्याच्या ह्रदयात ३ ब्लॉक आहेत. जे ९० टक्केहून अधिक आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालायत उपचार करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य केली असून खासगी रुग्णालयात उपचाराला परवानगी देण्यात आली आहे. याबाबत उपचारानंतर १५ दिवसात वाझेवर काय उपचार करण्यात आले, त्याची कागदपत्रे जमा करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.