मुंबई- राज्यात कोरोनाच्या बरोबरीने जीवघेण्या अशा म्यूकरमायकोसिस आजाराने कहर माजवला आहे. या आजाराने राज्यात अंदाजे 90 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर रोजच्या रोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. अशावेळी आरोग्य यंत्रणासमोर या आजाराला रोखण्याचे आव्हान असून हे आव्हान कसे पेलायचे याचे उत्तर अखेर राज्य म्यूकरमायकोसिस टास्क फोर्सने दिले आहे. कोरोनावरील उपचार घेत असल्यापासून पुढील 100 दिवस रुग्णाची साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम डॉक्टरांकडून झाले तर त्या रुग्णाला म्यूकरमायकोसिस होणारच नाही, असा दावा डॉ. आशेष भूमकर, सदस्य, राज्य म्यूकरमायकोसिस टास्क फोर्स यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.
'लवकरच आपण या आजाराला हद्दपार करू'
रुग्णांची साखर 140 ते 180 दरम्यान ठेवली तर त्याला हा आजार होत नाही. पण कोरोना काळात साखर नियंत्रित ठेवण्याला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळेच रुग्णांची साखर प्रचंड वाढून म्यूकरमायकोसिसची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर आता कोविडचे रुग्ण हाताळणाऱ्या सर्व डॉक्टरांना रुग्णांची साखर रोज तपासत पुढील 100 दिवस ती नियंत्रणात ठेवावी, अशा गाईडलाइन राज्य सरकारच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणाना दिल्या आहेत. तेव्हा या गाईडलाइनचे तंतोतंत पालन झाले तर लवकरच आपण या आजाराला हद्दपार करू असा विश्वास डॉ. भूमकर यांनी व्यक्त केला आहे.
अशी होते 'म्यूकॉर' बुरशीची बाधा
म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून तो 'म्यूकॉर' नावाच्या बुरशीपासून होतो. ही बुरशी वर्षोनुवर्षे आपल्या हवेत, मातीत आहे. तर रोजच्या रोज श्वासाद्वारे प्रत्येकाच्या शरीरात जाते. अगदी जन्मापासून मरेपर्यंत आपल्या शरीरात म्यूकॉरचे कण जातात. पण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तातील साखरेचे योग्य प्रमाण राहत असल्याने याचा आजार होत नाही किंवा याची बाधा होत नाही. फक्त ज्या रुग्णांची साखर वाढते, साखर खूप वाढून शरीरात फ्री आयर्न तयार होते अर्थात एक प्रकारे शरीरात साखरेचा पाक तयार होतो आणि मग त्या रुग्णाला म्यूकॉर बुरशीची बाधा होते. त्यातून म्यूकरमायकोसिस आजार होतो. हा आजार खूपच दुर्मीळ असून या आजाराची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्याही अत्यंत नगण्य आहे. ज्या रुग्णांची साखर नियंत्रणात राहत नाही आणि ती खूपच वाढते तेव्हाच या आजाराची लागण होते. त्यातही वृद्ध आणि किडनी-मधुमेहाचा त्रास असलेल्या, खूपच आजारी असलेल्या वृद्ध व्यक्तीना मोठ्या संख्येने याची लागण होते. त्यानुसार कोरोना आधी एका कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वर्षाला 4 ते 5 रुग्ण उपचारासाठी येत होते. तिथे आज एक डॉक्टर दिवसाला 10 रुग्ण तपासत असून ही चिंतेची बाब असल्याचे डॉ. भूमकर सांगतात.
'वेळेत निदान झाले तर बरे अन्यथा...'
म्यूकरमायकोसिस आजार जुना आणि खूपच दुर्मीळ आहे. त्यातही या आजाराचा मृत्यूदर 60 ते 80 टक्के असा असून उपचार न मिळाल्यास मृत्यूदर 100 टक्के आहे. पण जर हा आजाराचे वेळेत निदान झाले आणि योग्य उपचार दिले गेले तर दोन आठवड्यात हा आजार बरा होतो. पण जर या आजाराचे निदान झाले नाही आणि तो बळावला तर रुग्णाला डोळा, टाळू गमवावा लागतो आणि त्यात मोठ्या संख्येने रुग्ण दगावतात. त्यामुळे मुळात रक्तातील साखर 180 च्या पुढे जाऊच देऊ नका, 140 ते 180 दरम्यान साखर नियंत्रित ठेवा. म्हणजे हा आजार तुमच्या जवळपासही फिरकणार नाही असेही डॉ. भूमकर सांगतात. दरम्यान मधुमेही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास आणि रक्तातील साखर वाढत गेल्यास या रुग्णाला म्यूकरमायकोसिस आजाराचा धोका वाढतो. त्याचवेळी कोरोना विषाणू इतका घातक आहे की ज्या रुग्णांना मधुमेह नाही त्यांच्या रक्तातील साखर वाढवून त्यांना मधुमेह आजार देत आहे. त्यामुळेच कोरोनाची लागण झाल्यानंतर मधुमेह आजार झालेल्या रुग्णांची संख्या मागील वर्षभरात वाढती आहे. तर आता मधुमेही रुग्णांचे साखरेचे प्रमाण प्रचंड वाढल्यास म्यूकरमायकोसिसची लागण होत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि त्यातही मधुमेह असलेल्या, कोरोनात मधुमेह आजार जडलेल्या रुग्णांनी रोज साखर तपासावी. ती 180 दरम्यान नियंत्रणात ठेवावी. जर साखर वाढली तर औषधे आणि इन्सुलिन देत ती नियंत्रित करावी, असा सल्ला डॉ. भूमकर यांनी कोविडचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिला आहे.