महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात सरत्या वर्षाला निरोप.. नव वर्षाचे उत्साहात स्वागत.! - गोवा मुंबई पर्यटक

welcome 2021
new year celebration

By

Published : Jan 1, 2021, 6:46 AM IST

Updated : Jan 1, 2021, 3:34 PM IST

12:39 January 01

नूतन वर्षानिमित्ताने पंढरीत भाविकांची गर्दी, ऑनलाईन बुकींग नसल्याने मुख दर्शनाकडे रांग

नूतन वर्षानिमित्ताने पंढरीत भाविकांची गर्दी

पंढरपूर - 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी गर्दी केली आहे. काही भाविक पहाटेपासूनच पंढरीत दाखल झाले आहेत त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग, चंद्रभागा वाळवंटात भाविकांची गर्दी झाली होती. नवीन वर्षानिमित्त विठूरायाची नगरी गर्दी वाढल्याने ज्या भाविकांचे ऑनलाईन दर्शन बुकिंग नव्हते, त्यांनी मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले. विठू माऊलीचे नामस्मरण केले. सावळ्या विठूरायाचे दर्शन घेऊन धन्य झाल्यानंतर परत गावाकडे जावे लागत आहे. 

विठ्ठल मंदिर समितीकडून विठूरायाच्या दर्शनासाठी 4800 भाविकांना ऑनलाइन दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन मिळणार आहे. यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तर ऑनलाईन बुकींग संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. आतापर्यंत 73 हजार भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले आहे.

12:09 January 01

नव वर्षाच्या स्वागतावेळी महाबळेश्वरच्या रस्त्यांवर शुकशुकाट

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री दहा नंतर संचारबंदी लागू केल्याने थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर व पाचगणी शहर गुरुवारी ३१ डिसेंबरच्या रात्री शांत होते. त्यामुळे पूर्वसध्येला दाखल झालेल्या पर्यटकांनी मावळत्या वर्षाचे सेलिब्रेशन व नववर्षाचे स्वागत हाॅटेलमध्ये राहूनच केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
 

11:45 January 01

लोणावळ्याकडे पर्यटकांची पाठ; नववर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांचे मोठे नुकसान

लोणावळा पर्यटनस्थळ

पुणे - लोणावळ्यात सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाच स्वागत करण्यासाठी प्रतिवर्षी पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते. मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि नववर्षाच्या स्वागत पार्ट्या करण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांनीही लोणावळण्याकडे यावेळी पाठ फिरवली. मात्र, या सर्वाचा फटका येथील स्थानिक लहान व्यावसायिकांना बसला आहे.  यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्यूमुळे पर्यटनस्थळी शुकशुकाट होता. 

नाताळ आणि न्यू इयर दरम्यान तीन लाख पर्यटक लायन्स आणि टायगर पॉईंट येथे दाखल होतात. यावर्षी तुरळक पर्यटक दाखल झाले, त्यांचा ही हिरमोड झाला. एकूणच स्थानिक किरकोळ व्यवसायाला 70 टक्के फटका बसला आहे

11:36 January 01

नव वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने; कोरोनामुक्तीचे बाप्पाला साकडे

नव वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकर आणि सिद्धिविनायकाचे भक्त आज मुंबईतील प्रभादेवी येथे उपस्थिती लावून गणेशाचे दर्शन घेत आशीर्वाद घेत आहेत.  यावेळी भाविक कोरोनामुक्त मुंबई व्हावी,असे साकड गणेशाकडे घालत आहेत.

कोरोना काळामुळे भाविकांची यंदा कमी आहे. मात्र, भाविकांचा उत्साह तसाच आहे. यावेळी दर्शनासाठी क्यूआरकोड स्कॅन केल्याशिवाय दर्शनासाठी जाता येत नाही. त्यामुळे काही नागरिकांनी बाहेरूनच दर्शन घेऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. तासाला ८०० जणांना दर्शन घेण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. 

10:59 January 01

नव वर्षाच्या पूर्वसंध्येला ३ अमली पदार्थ तस्कर जेरबंद; मुंबई नारकोटिक्सची कारवाई

नव वर्षाचे स्वागत करण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अवैध धंद्यावर छापेमारी करण्यात आली होती. त्यापैकी अंधेरी कुर्ला परिसरात केलेल्या कारवाईत तीन अमली पदार्थ तस्कारांना पोलिसैांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील नारकोटिक्स विभागाने गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली.

10:37 January 01

पिंपरी-चिंचवडमध्ये नूतन वर्षाच स्वागत वाहन तोडफोडीने; 13 जण ताब्यात

नूतन वर्षाच स्वागत वाहन तोडफोडीने; 13 जण ताब्यात

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात नूतन वर्षाचे स्वागत वाहन तोडफोडीच्या सत्राने झाले आहे. शहरातील मोहन नगर येथे दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने सहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, नूतन वर्षाची सुरुवातच वाहनांच्या तोडफोडीच्या सत्राने झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. 
 

10:28 January 01

दारू पिऊन वाहन चालविण्याच्या संदर्भात 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलिसांनी 35 जणांवर केली कारवाई

मुंबई पोलिसांनी 35 जणांवर केली कारवाई

09:30 January 01

नव्या वर्षात वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घ्या; मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

09:29 January 01

राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारे नववर्ष - अजित पवार

हे नववर्ष राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत!

09:22 January 01

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार सुरू होताच निर्देशांकाची उसळी

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार सुरू होताच निर्देशांकाची उसळी

२०२१ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारात उसळी पाहायला मिळाली; मुंबई शेअर बाजार 114 अंशांनी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 47 हजार 866 इतका झाला आहे. 

09:10 January 01

गोव्यात मांडवी नदीच्या पुलावरून पर्यटकांनी घेतला सूर्योदयाचा आनंद

पणजी - नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्याला अधिक पसंती देतात. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गोव्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गुरुवारी मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप गोवेकरांसह पर्यटकांनी नव वर्षाचे स्वागत केले. त्यानंतर आज २०२१ या नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्याचा आनंदही पर्यटकांनी लुटला आहे. पणजी शहरातून वाहणाऱ्या मांडवा नदीच्या पूलावरून  सूर्योदयाचे हे प्रतिबिंब ईटी व्ही भारतने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

08:39 January 01

पुण्यात गृहमंत्री अनिल देशमुखांची कंट्रोल विभागाला भेट; केक कापून नववर्षाचे केले स्वागत

पुण्यात गृहमंत्री अनिल देशमुखांची कंट्रोल विभागाला भेट

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीसांसोबत नववर्षाचे स्वागत केले. यावेळी रात्री बारा वाजता तक्रारीचा कॉल गृहमंत्र्यानी उचलला. या वेळी कंट्रोल रूमला भेट देत बरोबर 12 वाजताचा तक्रारीचा कॉल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचलला. नवीन वर्षातील तो पहिला कॉल होता. एका सोसायटीत नवीन वर्षाचे स्वागत 12 पर्यंत सुरु आहे. आवाज कमी करायला सांगा असा तो कॉल होता. लगेच त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे त्यांनी कॉल दिला.

08:36 January 01

पंढरपुरात वारकऱ्यांची विठूरायाच्या दर्शनासाठी रिघ; मंदिरात आकर्षक सजावट

वि्ठ्ठल मंदिर

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री विठ्ठल मंदिरात झेंडूच्या फुलांनी आरास निर्माण करण्यात आली आहे यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मनमोहक सजावट करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूर मध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक पंढरपूर मध्ये दाखल होत आहेत. वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरीतील नामदेव पायरी, महाद्वार, चौफळा, स्टेशन रोड याठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपुरातील भक्त निवास, लॉज, मठ हे भाविकांनी हाऊसफुलं झाले आहेत. 

08:34 January 01

शिर्डीत साई दर्शनासाठी भक्तांच्या रांगा; उत्साहात केले नव वर्षाचे स्वागत

शिर्डीत साई दर्शनासाठी गर्दी

07:45 January 01

गोव्यात कोरोनाचे नियम पाळत नव वर्षाचे स्वागत; पणजीमध्ये फटाक्यांची आतषबाजी

पणजी नव वर्ष स्वागत

पणजी - सरत्या वर्षाला निरोप देत पणजीमध्ये पर्यटकांना मोठ्या उत्साहात नव वर्षाचे स्वागत केले. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने पर्यटकांनी सामाजिक अंतर पाळत नव वर्षाचे स्वागत केले. तर पणजीमध्ये रात्री १२ वाजताच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

07:39 January 01

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट

विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट

पंढरपूर - सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. तसेच नव वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या या सजावटीमध्ये सावळ्या विठूरायाचे रुप आधिकच खुलून दिसत आहे. नव वर्षाच्या निमित्ताने असंख्य भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे. 

07:31 January 01

देवाची आळंदी: नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

06:34 January 01

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर आकर्षक विद्यूत रोषणाई

नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या भागात शुकशुकाट दिसून आला

06:30 January 01

साईंच्या दर्शनाने नव वर्षाचे स्वागत; शिर्डीत भाविकांची मांदियाळी

साईंच्या दर्शनाने नव वर्षाचे स्वागत; शिर्डीत भाविकांची मांदियाळी

शिर्डी- सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांच स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली आहे. नव वर्षाच्या पूर्व संध्येपासूनच भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सरत्या वर्षाला निरोप देत रात्री 12 वाजेच्या सुमारास नवीन वर्षात पदापर्ण करताना भाविकांनी साईं मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

नवीन वर्ष साईंच्या दर्शनाने सुरु करण्यासाठी शिर्डीच्या साईमंदिराच्या दर्शनबारीसह मंदिर परीसरात भाविकांची मांदियाळी दिसून आली. बरोबर रात्री 12 वाजता साईंच दर्शन घ्यावे या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून आले. ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही, त्यांनी साई समाधी मंदिराच्या कळसाच दर्शन घेत धन्यता मानली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुल ठेवण्यात आल्याने शेकडो भाविकांना रात्रीतून साईचे दर्शन घेतेले. अद्यापही मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

06:06 January 01

मुंबई- २०२० हे वर्ष कोरोना या महामारीने ग्रासल्याने जनजीवन विस्कळीत करणारे ठरले. राजकीय, सामाजिक घडामोडींसह लक्षवेधी ठरलेल्या या वर्षाला राज्यातील नागरिकांनी निरोप देत नव वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले आहे. येणारे हे वर्ष कोरोनामुक्त आणि  आरोग्यदायी जावे अशा शुभेच्छांचा वर्षाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ डिसेंबरला नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना प्रतिवर्षी प्रमाणे मोठ्या जल्लोषात नव वर्षाचे स्वागत करता आले नाही. मात्र, नव्या वर्षात नागरिकांनी देव दर्शन, धार्मिक आणि पर्यंटन स्थळांना भेटी देत नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. त्या संबंधीचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा... 

Last Updated : Jan 1, 2021, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details