मुंबई - मुंबईमधील रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जातो. मात्र, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याने ते बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. जिओ पॉलिमर, पेव्हर ब्लॉक, एम ६०० आणि रॅपिड हार्डनिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सिमेंट कॉंक्रिट रोड आणि डांबरी (अस्फाल्ट) रोडवरील खड्डे बुवण्यात आले. यामधील चांगले तंत्रज्ञान पुढे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणार ( new technology by Mumbai Corporation fill potholes ) आहे.
जिओ पॉलिमर तंत्रज्ञान - पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर खड्डे पडत असल्याने मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉंक्रिट रोडचे काम हाती घेण्यात येत आहे. अनेकदा सिमेंटच्या रस्त्यावरही खड्डे पडतात. अशावेळी संपूर्ण सिमेंट ब्लॉक दुरूस्त करणे खर्चाचे तसेच वेळ खाऊ प्रक्रिया आहे. खड्डे बुजवल्यावर वाहतूकही थांबवावी लागते. यासाठी जिओ पॉलिमरचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून २ इंच ते ४ इंचापर्यंतचे खड्डे बुजवण्यासाठी हे मटेरिअल उपयुक्त आहे. त्यामध्ये सीसी रोडला पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करणे शक्य आहे. यासाठी ५ हजार रूपये प्रति चौरस मीटर इतका तंत्रज्ञानाचा खर्च असणार आहे. जिओ पॉलिमर हे पेटंट असणारे मटेरिअल असून, त्यामध्ये एडेसिव्हचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये त्या मार्गावरील वाहतूक सुरू करणे शक्य होते.
पेव्हर ब्लॉक -डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सर्वात स्वस्त अशा पेव्हर ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान अवघ्या ५०० रूपये चौरस मीटर इतके स्वस्त आहे. महत्वाचे म्हणजे चांगल्या दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरून दीर्घकाळ वापरात येणारे हे तंत्रज्ञान आहे. पेव्हर ब्लॉकला आयुष्यमान अधिक आहे. तसेच अवजड वाहनांच्या रस्त्यावरही हे उपयुक्त ठरणारे असे तंत्रज्ञान आहे.