महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रस्त्यावर पार्किंग केल्यास १० हजार रुपये दंड, महापालिकेचा निर्णय - महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबईत ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग न केल्यास महापालिका १ ते १० हजार रुपये दंड वसूल करणार आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

By

Published : Jun 30, 2019, 3:58 AM IST

मुंबई - पालिकेने ठरवून दिलेल्या जागी पार्किंगच्या १ किलोमीटर परिसरात बेकायदेशीर पार्किंग केल्यास दंड वसूल करण्याचा प्रस्ताव शनिवारी मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करताना पार्किगसाठी असलेली एक किलोमीटरची अट रद्द करून १०० ते ५०० मीटर केली जाणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि विरोधी पक्ष नेते रवी राजा

वाहन चालवणाऱ्यांनी ७ जुलैपासून ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करावे अन्यथा त्या पार्किंगच्या एक किलोमीटर परिसरात वाहन पार्क केल्यास १ ते १० हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याचे पडसाद स्थायी समिती, सुधार समिती नंतर गटनेत्यांच्या बैठकीत उमटले. पार्किंगसाठी वाहनतळ कमी असून त्या ठिकाणी एकावेळी हजारो वाहने आल्यास पालिका कोणती व्यवस्था करणार, असा प्रश्न गटनेत्यांनी विचारला. मुंबईत असणार्‍या लाखो वाहनांसाठी पालिकेची पार्किंग व्यवस्था अपुरी पडणार असल्यामुळे दंडासाठी १ किमी अंतराची हद्द संबंधित विभागातील परिस्थितीनुसार १०० ते ५०० मीटर केल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका सर्वपक्षांच्या गटनेत्यांनी घेतली. यामुळे १ ते १० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर पडला आहे.

मुंबईत कोठेही पार्किंग केल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शिस्त लागणे गरजेचे आहे. येत्या काही काळात ‘बेस्ट’मध्ये ३ हजारांवर बस येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र १ ते १० हजारांच्या दंडाची वसुली सरसकट न करता संबंधित विभागवार करावी, यासाठी धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे. याकारणाने सुधारणा करण्यासाठी हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. शहरात पार्किंगच्या जागा कमी आहेत, त्यामुळे पार्किंगबाबत कोणताही निर्णय घेताना सभागृहात त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details