मुंबई - ओमायक्रॉन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या चाचण्यांचा अहवाल आला असून या प्रवाशाला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग ( Omicron Patient in Dharavi ) झाल्याचे समोर आल्याची माहिती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. त्यामुळे पुन्हा आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णावर पालिकेच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतील धारावी परिसरात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. ती व्यक्ती टांझानियाहून परतली होती, तिच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिली आहे. रुग्णाला मोठ्या प्रमाणात लक्षणे नाही आहेत आणि लसीकरण केलेले नाही, रुग्णाला घेण्यासाठी आलेल्या दोन लोकांचाही शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव -
राज्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवली येथे आढळला. त्यानंतर मुंबईमधील २ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यातच धारावी येथे पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. या व्यक्तीवर सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले होते. या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल कस्तुरबा रुग्णालयाकडून देण्यात आला आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कातील २ जणांची चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.