मुंबई -मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत (Corona Cases) असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron New Cases) आढळून येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेल्या ३७ प्रवाशांना तर ४ मुंबईकर नागरिकांना अशा एकूण ४१ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४०९ झाली आहे. त्यापैकी १७९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १४,९१८ प्रवासी आले. त्यामधील १२८ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबर पासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात २३९ प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील ३६ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत परदेश प्रवास केलेले १९४ (११९ पुरुष, ७५ स्त्री) तसेच २१५ ( १०९ पुरुष, ५५ स्त्री) अशा एकूण ४०९ जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण ४०९ पैकी १७९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.
- नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.