नवी मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते, माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ५२ नगरसेवकांची बैठक बोलावली होती, या बैठकीत भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार ; गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब ? गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडाच - नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी त्यांच्याच समर्थकांचा दबाव वाढू लागला आहे. ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांची नवी मुंबईतील महापौर जयवंत सुतार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत काहींनी उघडपणे गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडाच अशी आरोळी ठोकली आहे. सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर गणेश नाईक हे भाजप प्रवेश करणारच यावर बहुदा शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या या निर्णयामुळे नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी ऐवजी भाजपची सत्ता येईल.
गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ५२ नगरसेवकांसोबत चर्चा करताना गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकू येत होती. राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकल्या असल्या तरी, नाईक यांची गेल्या २० वर्षांपासून नवी मुंबई महानगर पालिकेवर सत्ता आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत महापालिका प्रभागांनुसार झालेले मतदान पाहिले असता, प्रत्येक प्रभागात शिवसेनेने आघाडी मिळवले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही, असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. आता गणेश नाईक काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. ईडीच्या कारवाईची धमकी देत, दबाव आणत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडले जात आहे, असेही पवार यांनी म्हटले होते. या नंतर आता काही दिवसात राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले गणेश नाईक यांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीने नवी मुंबईत राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहे.