मुंबई- कॊरोनाच्या नावाने आजही जगात दहशतीचे वातावरण असताना आता कोरोनाचा नवा अवतार अर्थात नवे म्युटेशन आढळले आहे. या म्युटेशनचे नाव डी-614 असे असून हा कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वात घातक म्युटेशन असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कारण कॊरोना विषाणूचे हे म्युटेशन आताच्या म्युटेशनपेक्षा थेट 10 पट वेगाने संसर्ग वाढवते.
मलेशियात हे म्युटेशन आढळले असून हा पसरला तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकताच मलेशियात कॊरोना विषाणूचे हे नवे रूप आढळले आहे. कॊरोना विषाणू चालाखपणे आपल्यात बदल करत आहे. त्यानुसार आता डी-614 हा नवा बदल मलेशियात पाहायला मिळाला आहे.
भारतातून मलेशियात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये कॊरोनाचे हे म्युटेशन आढळले आहे असेही त्यांनी सांगितले आहे. पण आता हे म्युटेशन खूपच कमी प्रमाणात असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. मात्र हा कॊरोना आताच्या कॊरोनापेक्षा 10 पट वेगाने संसर्ग पसरवत आल्याने त्याची भीती आहे, असेही डॉ. भोंडवे म्हणाले.