मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'पीडियट्रिक टास्क फोर्स' लहान मुलांना कोरोनाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी राज्य सरकारला उपाययोजना सुचवत आहे. कोरोनाची लागण झालेल्या नवजात शिशूपासून ते मोठ्या बालकांना योग्य औषधोपचार मिळावेत, यासाठी ऑक्सिजन बेड्स, एनआयसीयू बेड्स तसेच इतर सुविधा वाढविणे सुरु आहेत. पण कोरोनाबरोबरच लहान मुलांना पोस्ट कोविड आजार उद्भवण्याचा धोका आहे. त्यातही 'पीडियट्रिक मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम' (पीएमआयएससी) या आजाराची लागण मोठ्या संख्येने होण्याची भीती 'पीडियट्रिक टास्क फोर्सने' व्यक्त केली आहे. त्यामुळेच या आजाराच्या धोक्यापासून मुलांना वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या सर्व उपाययोजना राज्य सरकारला सुचवण्यात आल्याची माहिती, डॉ. आरती किणीकर, सदस्य, पीडियट्रिक टास्क फोर्स यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.
'पीडियट्रिक मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम' म्हणजे काय?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना कमी संख्येने बाधा झाली. पण दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित मुलांची संख्या बऱ्यापैकी वाढली. तर त्याचवेळी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त मुलांमध्ये पीएमआयएससी आजार दिसून आला. मुंबईतील नायर, वाडिया रुग्णालयात मोठ्या संख्येने असे रुग्ण पहिल्या लाटेत आढळले. तर दुसऱ्या लाटेतही मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात या आजाराच्या मुलांची संख्या मोठी दिसून येत असल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले आहे. पीएमआयएससी हा आजार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना होतो. हा आजार जुना असून या आजारात मुलांना ताप येतो, अंगावर लाल चट्टे येतात, डोळे लाल होतात, दम लागतो. त्यामुळे अशी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ मुलांना डॉक्टरांकडे नेणे गरजेचे असते. जर मुलांना वेळेवर उपचार मिळाले नाही तर आजार बळावतो आणि मग हा आजार हृदय, किडनी, मेंदू, फुफ्फुस अशा अवयवांवर दुष्परिणाम करतो. तसेच मुले गंभीर होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे हा आजार घातक मानला जातो. हा आजार जुनाच आहे, पण अशा रुग्णांची संख्या कमी असते. कोरोना काळात मात्र पोस्ट कोविडच्या रूपाने या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोना मुक्त झालेल्या मुलांना दोन ते तीन आठवड्यानंतर ताप येत आहे. त्यानंतर अंगावर चट्टे येत असून पुढे त्याचा मोठा दुष्परिणाम रुग्णांच्या अवयवांवर होत आहे. फुफ्फुस, हृदय, किडनी, मेंदू, धमन्या असे अवयव हा आजार निकामी करण्यास सुरुवात करतो. त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर या आजाराचे निदान होणे आणि त्यावर उपचार होणे गरजेचे आहे. अन्यथा ही मुले थेट व्हेंटिलेटरवर जात असून त्यांचा जीव धोक्यात येतो. तेव्हा जर मोठ्या संख्येने लहान मुलांना कोरोनाची लागण होणार असेल तर मग त्याबरोबरीनेच पोस्ट कोविडमध्ये पीएमआयएससी आजार वाढवण्याची दाट शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड्स वाढवणार -
तरुण आणि ज्येष्ठांना मोठ्या संख्येने कोरोनामुक्तीनंतर पोस्ट कोविड आजार होताना दिसत आहेत. मोठ्यांमध्येही 'मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम' हा आजार पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत दिसून आला आहे. तर आता मोठ्यांच्या पोस्ट कोविड आजारात 'म्यूकरमायकोसिस'ने डोके वर काढले आहे. तेव्हा पोस्ट कोविड आजार होतात असे गृहीत धरत लहानग्यांना पीएमआयएससी आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. अशावेळी मुलांना एनआयसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) आणि पीआयसीयू (पीडियट्रिक अतिदक्षता विभाग)ची गरज मोठ्या संख्येने लागणार आहे. तर हे एनआयसीयू आणि पीआयसीयू अद्ययावत असणे गरजेचे आहेत. त्यात सर्व सुविधाही हव्यात. तेव्हा याचा सर्व आराखडा तयार करत असे एनआयसीयू-पीआयसीयू बेड्स वाढवण्यासाठीची शिफारस राज्य सरकारला केल्याची माहिती डॉ. किणीकर यांनी दिली. मुंबई, पुण्यासारख्या शहरात या सुविधा आहेत. तर त्या तात्काळ वाढवता ही येतील. पण इतर जिल्ह्यात, गावात या सुविधा नसल्याने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात असे बेड्स तयार करण्याची शिफारस 'पीडियट्रिक टास्क फोर्स'ने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुलांना त्यांच्या शहरात, घराजवळ योग्य औषधोपचार मिळावेत यादृष्टीने ही आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तर लहान मुलांसाठी त्यातही नवजात शिशुसाठी वेगळ्या सुविधा असलेल्या अॅम्ब्युलन्स लागतात. अशा अॅम्ब्युलन्स खूप कमी संख्येने असून त्यातही मुंबई-पुण्यातच आहेत. त्यामुळे अशा अॅम्ब्युलन्स वाढवाव्या किंवा आहेत त्या अॅम्ब्युलन्समध्ये तशी सुविधा निर्माण करावी, अशा सूचना केल्याचे डॉ. किणीकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. मुळात मुलांना घराबाहेर काढायचे नाही. मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. तसेच ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे मुलांना न्यावे. तर कोविड मुक्त झाल्यानंतर पुढचे काही आठवडे मुलांकडे बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. पीएमआयएससीची कोणतीही लक्षणे आढल्यास त्यांना रुग्णालयात नेण्याचे आवाहन डॉ. किणीकर यांनी केले आहे.