मुंबई -कोरानाच्या लढ्याला यश येत असून राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातआज 2, 515 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 48 हजार 802 वर पोहचला आहे. तर आज 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे आजतागायत 51 हजार 360 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.74 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर 2.51 टक्के पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा-मुंबईत आज 7133 तर आतापर्यंत 82 हजार 884 आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस
आज 2, 554 रुग्ण कोरोनापासून बरे-
राज्यात आज 2,554 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 61 हजार 525 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 50 लाख 54 हजार 995 नमुन्यांपैकी 20 लाख 48 हजार 802 नमुने म्हणजेच 13.61 टक्के नमुने कोरोनाचे पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 67 हजार 694 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 34 हजार 640 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा-रेल्वे प्रवाशांकडून "नो मास्क, नो एन्ट्री"ला तिलांजली; पोलिसांशी रोज वाद
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत दोन लशींचा वापर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामध्ये पुण्याची कोव्हिशिल्ड आणि हैदराबादमधील कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत असल्याने कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मानण्यत येत आहे.