मुंबई- देशाच्या राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे बुधवारी 2, 377 रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 49 हजार 958 वर पोहचला आहे. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 547 वर पोहचला आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यात रोज सरासरी 1,300 ते 1,500 रुग्ण आढळून आले. रविवारी 1,962, सोमवारी 1,712, मंगळवारी 1,922 तर आज बुधवारी 2,377 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा-अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त
16 हजार 751 सक्रिय रुग्ण-
आज 876 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 20 हजार 754 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 16 हजार 751 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 145 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 34 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 267 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आजपर्यंत 36 लाख 14 हजार 528 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा-'पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड'
हे विभाग आहेत हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645 रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1,121, 4 मार्चला 1103, 5 मार्चला 1,173, 6 मार्च 1,188, 7 मार्चला 1,360, 8 मार्चला 1,008, 9 मार्चला 1,012 रुग्ण आढळून आले आहेत. तर 10 मार्चला 1,539, 11 मार्चला 1,508, 12 मार्चला 1,646, 13 मार्चला 1,708, 14 मार्चला 1,962, 15 मार्चला 1,712, 16 मार्च 1,922, 17 मार्चला 2,377 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते.
दादर मार्केट बंद करण्यात येणार-
मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा संसर्ग आहे. वर्षभरानंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दादर मार्केट लवकरच बंद केले जाणार आहे. दादर मार्केटमधील व्यावसायिकांसाठी सामाजिक अंतराचे पालन करता येईल, अशा पर्यायी ठिकाणी मार्केट सुरू केले जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिली आहे.