मुंबई -शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचा मुलगा नील सोमैयांवर पीएमसी बँक संबंधित आरोप केले होते. त्यानंतर अटकेची कारवाई होण्याची शक्यता पाहून नील सोमैया यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली ( Neil Somaiya Bail ) होती. यावर आज युक्तीवाद पुर्ण झाला असून, उद्या निकालावर सुनावणी होणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान हा किरीट सोमैयांच्या मुलाच्या कंपनीत संचालक असल्याचा आरोप केला होता. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमैया यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचेही राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हा शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता नील सोमैयांना अटक होण्याची शक्यता असल्याने न्यायालयात धाव घेतली होती.
यावर आज मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी नील सोमैयांच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला. त्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून, त्यावर 1 मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे नील सोमैयांना अटकपूर्व जामीन मिळणार का, हे पाहावे लागेल.