महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोण आहेत नीरज गुंडे; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांशी त्यांचे काय आहेत संबंध ? - देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आहे नीरज गुंडे

क्रुझ ड्रग्ज प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. रोज नवनवे खुलासे करणारे नवाब मलिक यांनी मुंबईतील ड्रग्ज माफिया हे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतात असा गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी जयदीप राणा आणि नीरज गुंडे यांच्याशी फडणवीसांचे काय संबंध, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. महत्त्वाच्या सरकारी अधिकारांच्या बदल्यांमध्ये नीरज गुंडेंची महत्त्वाची भूमिका होती. ईडीच्या कार्यालयात त्यांची नेहमी उठबस असते, असेही आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही नीरज गुंडे यांच्यासोबतचे संबंध नाकारलेले नाहीत. नीरज गुंडे हे केवळ आमच्याशीच संबंधीत नाहीत तर नवाब मलिकांनी एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांच्याबद्दल विचारले पाहिजे होते, असेही फडणवीस म्हणाले होते. असा सर्वत्र वावर असलेले नीरज गुंडे नेमके आहेत तरी कोण ?

RSS Mumbai
RSS Mumbai

By

Published : Nov 2, 2021, 7:09 AM IST

Updated : Nov 2, 2021, 7:19 AM IST

मुंबई - मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. समीर वानखेडेंवर सातत्याने वेगवेगळे आरोप करुन त्यांना अडचणीत आणणाऱ्या नवाब मलिकांनी आता त्यांचा मोर्चा भाजपकडे वळवला आहे. मलिकांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी फडणवीसांवर आरोप करताना नीरज गुंडे या व्यक्तीचे नाव घेतले असून ही व्यक्ती फडणवीसांची दूत होती आणि मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते कार्यालयापर्यंत सगळीकडे नीरज गुंडेचा मुक्त वावर होता असा आरोप केला. मलिकांनी केलेल्या आरोपानंतर नीरज गुंडे चर्चेत आले आहेत.

नीरज गुंडे यांची फडणवीसांच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्वाची भूमिका होती. सीबीआय, ईडीच्या कार्यालयात नीरज गुंडेची उठबस असायची असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. फडणवीस कायम नीरज गुंडेंच्या घरी जायचे आणि तिथे खलबतं व्हायची अशीही माहिती मलिकांनी दिली.

'नवाब मलिकांनी उद्धव ठाकरेंना विचारावे' -

‘देवेंद्र फडणवीसांनी नीरज गुंडे यांच्याशी आपले जवळचे संबंध असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील नीरज गुंडे यांचे घनिष्ट संबंध आहेत, तेव्हा नवाब मलिकांनी नीरज गुंडे कोण, हे एकदा उद्धव ठाकरेंना विचारावे', फडणवीसांनी असा टोला नवाब मलिकांना लगावला आहे. यानिमित्ताने नीरज गुंडे नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न समोर आला आहे.

संघ परिवारातील गुंडे -

नीरज गुंडे यांचे आजोबा मुंबईमधल्या शिवाजी पार्क परिसरात संघाचे संचालक होते. नीरज गुंडे यांच्या आत्या गीता गुंडे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या आणि समन्वयाचे काम करायच्या. यामुळे संघ आणि भाजप परिवारातील अनेक नेत्यांशी गुंडे यांचे जवळचे संबंध आहेत असं बोललं जातं.

उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध -

भाजपचे प्रसिद्ध नेते सुब्रमण्यम स्वामी आणि नीरज गुंडे यांचे जवळचे संबंध होते. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासोबतच नीरज गुंडे हे पहिल्यांदा 'मातोश्री'वर पोचले होते. इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि नीरज गुंडे यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेना-भाजप यांच्यामध्ये जेव्हा राजकीय धुसफूस सुरु होती. तेव्हा शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे काम आणि दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचे काम नीरज गुंडे यांनी केले होते. 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती न करण्याची घोषणा केली होती. असं म्हटलं जातं की यानंतर गुंडे यांनी मध्यस्थी करुन ठाकरे-फडणवीस भेट घडवून आणली. 2019मध्ये मुंबईतल्या चेंबूर येथे नीरज गुंडे यांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थाऩी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. याच बैठकीत सेना-भाजप युतीचे सुतोवाच करण्यात आले होते. ठाकरे-फडणवीसांच्य़ा याच बैठकीनंतर भाजप अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर गेले आणि 2019च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी भाजप शिवसेना यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. असेही म्हटले जात आहे.

नीरज गुंडे 'प्रमोद महाजनां'च्या भूमिकेत..

सेना-भाजप युतीच्या पडद्यामागचे कलाकार म्हणून नीरज गुंडे यांचे नाव घेतले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतर जेव्हा भाजप आणि सेनेची युती तुटली तेव्हासुध्दा नीरज गुंडे यांनी पुन्हा युती व्हावी यासाठी मातोश्रीवर अनेक चकरा मारल्या. पण तेव्हा नीरज गुंडे यांची शिष्टाई फळाला आली नाही आणि नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. नीरज गुंडे हे स्वत: व्यावसायिक असल्याचे सांगतात. तसेच ते आरटीआय कार्यकर्ते असल्याची माहिती देखील मिळते. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी ज्या पद्धतीने शिवसेना - भाजप युती टिकवण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न नीरज गुंडे यांनी केल्याचे समजते.

Last Updated : Nov 2, 2021, 7:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details