मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची चार कोटी वीस लाखांची स्थावर मालमत्ता ईडी(enforcement directorate)ने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली. मात्र या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik ) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईडीकडून जी मालमत्ता जप्त करण्यात आली, त्या मालमत्तेचा व्यवहार 2004 आणि 2005 साली झाला होता. मग ईडीकडून या मालमत्तेचा संबंध नुकत्याच झालेल्या कथित गैरव्यवहारासोबत कसा जोडण्यात आला, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
'जप्त केलेल्या मालमत्तेचा व्यवहार पंधरा वर्ष आधीचा'
ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत वरळी येथील अनिल देशमुख यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटची मालकी अनिल देशमुख यांच्या पत्नीकडे आहे. हा फ्लॅट 2005साली खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी असलेले आमदार रामकृष्ण पाटील यांच्याकडून हा फ्लॅट खरेदी करण्यात आला असून, हा फ्लॅट सरकारी जागेत असल्याने त्यावेळेस मालकीहक्क ट्रान्सफर करण्यात अडचण येत होती. मात्र त्यानंतर हा फ्लॅट देशमुख यांच्या पत्नीच्या नावावर करण्यात आला. पण फ्लॅटच्या मालकी हक्काची कागदपत्रे ही 2005मध्येच असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पंधरा वर्षांआधी झालेल्या व्यवहाराचा संबंध ईडीकडून आता कसा काय लावण्यात येत आहे, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तसेच उरणमध्ये असलेली जागाही अनिल देशमुख यांच्या मुलाच्या नावावर आहे. या जागेसाठी झालेल्या व्यवहाराची रक्कम हवाला मार्गाने आल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. मात्र देशमुख कुटुंबीय चालवत असलेल्या एज्युकेशन ट्रस्टला देणगी स्वरूपात आलेल्या रकमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे पैसे हवाला मार्गाने आल्याचे ईडीकडून आरोप केला जात आहे. 17 वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहाराचा संबंध आता केलेल्या आरोपांबाबत कसा काय होऊ शकतो, असाही प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे.