मुंबई -देशात सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढल्याचा आरोप राष्ट्रवादीने आज केला. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने यासंदर्भातील आकडेवारी काढल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज मोदी सरकारवर यावरून सडकून टीका केली.
बेरोजगारी वाढली
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे. आकडा सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. तर ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेला आहे, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल तपासे यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
मोदी सरकार अपयशी
सुरुवातीपासून केंद्रातील मोदी सरकारचे धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकूल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटाबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली आणि उद्योगधंद्यांना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही आणि त्याचा परिणाम देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला, असाही आरोप महेश तपासे यांनी केला. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, असे सांगणारे मोदींचे सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकली नाही, ही वास्तवता समोर आली आहे, असेही तपासे म्हणाले.