मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सोमैयांचा समाचार घेतला. सोमैया यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, अशी जोरदार टीका तपासे यांनी यावेळी केली.
भुजबळांचा संबंध नाही'
अल जेब्रिया कोर्टसंदर्भात किरीट सोमैया यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
'वस्तुस्थिती समजून घ्यावी'
भाजपा नेते वारंवार असे बेछूट आरोप करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कारस्थान ताबडतोब थांबवावे, असे ते म्हणाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर किरीट सोमैया यांनी ट्विटद्वारे आरोप केले आहेत. या आरोपावरून तपासे यांनी जोरदार टोलेबाजी केली.