मुंबई -राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रूपये,तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले. या बाबत माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटीची मदत - News about the Nationalist Congress
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटीची मदत करण्यात आली आहे. या बाबत माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजित पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.