मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (9 सप्टेंबर) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीतील चर्चेकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी नेते, मंत्र्यांकडून शिवसेनेची तक्रार?
शरद पवार यांनी काल (8 सप्टेंबर) राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार मंत्री तसेच खासदार उपस्थित होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी शिवसेनेबाबत शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि आमदारांची मतदारसंघातील कामे होत नाहीत, असा सूर काही नेत्यांनी उमटवला. याची दखल घेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही भेट होईल.