महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सदस्यांच्या अभियानात सहभागी होणार, आज दिवसभर मीदेखील अन्नत्याग करणार'

राष्ट्रवादी काँग्रेसने विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. स्पष्ट भूमिका घेतली, विरोध केला, मत मांडली. आमचा पाठिंबा आहे, यात तथ्य नाही. शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

pawar
शरद पवार

By

Published : Sep 22, 2020, 3:08 PM IST

मुंबई -राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. ही विधेयकं तातडीने मंजूर करावी, असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता. विरोधकांना काही आक्षेप होते, तरीही सरकारने काम रेटून नेण्याचा‌ प्रयत्न केला, अशी टीका शरद पवारांनी केली. केंद्र सरकारच्या राज्यसभेतील कृतीबाबत सहा खासदारांनी आंदोलन सुरू केले आहे. मी आज त्याच्या अभियानात सहभागी होणार आहे. आज दिवसभर मी अन्नत्याग करणार. काल राज्यसभेत जे घडत नाही ते बघायला मिळालं. मला काल दिल्लीला जाता आलं नाही, असे शरद पवार म्हणाले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी लवकर दाद मागण्याची गरज असल्याने मला दिल्लीत जाता आलं नाही, असं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

राज्यसभेत कृषी विषयक विधेयक मंजुरीसाठी येणार होती. या विधेयकांवर साधारणपणे 2-3 दिवस चर्चा होणे अपेक्षित असते. ही बिलं तातडीने मंजूर करावी, अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका होती. या बिलाबाबत सदस्यांना प्रश्न होते त्याबाबत चर्चा करण्याचा आग्रह होता. हा आग्रह बाजूला ठेवून सदनाचे काम पुढे रेटून नेण्याचं दिसत होतं. हे नियम विरुद्ध आहे हे सतत सभापतींना सांगत होते. प्रतिसाद न मिळाल्यामुळे वेलमध्ये सदस्यांनी धाव घेतली. नियमांचे पुस्तक फाडण्याचा प्रकार झाला. उपाध्यक्षांना ऐकून घ्यायला हवं होतं. पण ते न करता आवाजी पद्धतीने मतदान घेतलं, असे शरद पवार यांनी सांगितलं.

पवार म्हणाले, विधेयकं एका झटक्यात मंजूर करण्याची गरज नव्हती. यातील एक विधेयक कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देणार आहेत. त्यामुळे आता खासगी कंपन्यांना थेट शेतमाल खरेदी करण्याचा अधिकार मिळणार आहे. मी केंद्र सरकारमध्ये अन्न विभागाचा दहा वर्ष कारभार पाहिला आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भात आणि गव्हाची खरेदी होते. हे आधी नव्हतं. यात विरोधाभास आहे. अनेक गोष्टी आपल्या राज्यात होत्या. आम्ही विरोध केल्यानंतर केंद्र सरकार आता हमीभावाचा कायदा कायम राहील, असं सांगत आहे. सदस्यांचे म्हणणे होते सवलत दिली, एमएसपी ठेवू ते कायद्यात सांगा. एका बाजूला शेतमाल खुला होत असताना सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. नाशिक कांदा परदेशात जाईल अशी बंदी घातल्यानं दीर्घकालीन जागतिक शेतमाल व्यापारावर परिणाम होणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. या आरोपाचाही शरद पवार यांनी इन्कार केला. प्रसारमाध्यमांतून आमच्या सभा त्याची केलेली बातमी अर्धवट माहितीवर आधारित होती. प्रफुल्ल पटेल यांनी सदनात भाषण केले. राष्ट्रवादीने स्पष्ट भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी पण भाषण केले. मी नव्हतो हे खरं आहे. स्पष्ट भूमिका घेतली, विरोध केला, मत मांडली. आमचा पाठिंबा आहे यात तथ्य नाही. शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details