मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ( Ncp Mp Supriya Sule Corona Positive ) आला आहे. ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या आरोग्यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे
ट्वीट करत सुळे यांनी सांगितले , "मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या" असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे ( Minister Varsha Gaikwad Corona Positive ) समोर आले होते. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. आपल्या ट्विट मध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "मला आज सकाळी कळलं की माझाी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करत आहे."
दरम्यान, हिवाळी अधिवेशानाच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आलेल्या चाचणीत तब्बल 35 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
रुग्णसंख्येचा आलेख वाढताच
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे ( Maharashtra Corona Cases Increased ). मंगळवारी राज्यात 2 हजार 172 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला. 10 हजारांच्या घरात असणारी सक्रीय रुग्णांची संख्या 11,492 झाली आहे. तसेच, मंगळवारी शून्य ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.