मुंबई - राज्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी त्यांना शारीरिक अंतर ठेवण्याची अट घालावी, असेही खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने हॉटेल आणि लॉज १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची सोमवारी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लागू करण्यात आलेली टाळेबंदी काढण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी करणारे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हेही वाचा-नागपुरला नवे पोलीस आयुक्त; अमितेश कुमार लवकरच कार्यभार स्वीकारणार
काय म्हटले आहे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये?
कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली आहे. तरी या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंटचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा.
हेही वाचा-पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण : कोपरगावपासून सुरू झालेला समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम
राष्ट्रवादी हा राज्यातील महाविकासआघाडीत सहभागी आहे. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी जिम सुरू करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना केली होती.