मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील ( Why I Killed Gandhi Movie ) भूमिकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका ( Amol Kolhe In Nathuram Godase Role ) साकारली आहे. चित्रपटात नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या अगदी परस्पर विरोधी भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली आहे. याबाबत आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना अमोल कोल्हे यांनी मात्र, 'या भूमिकेकडे कलाकार म्हणून पहा' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ( Amol Kolhe Reacted On Godase Role ) आहे.
कथानकाची गरज, विचारधारेशी संबंध नाही- कोल्हे
"एखाद्या चित्रपटाच्या कथानकानुसार अभिनेत्याला भूमिका वठवावी लागते. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या सांगण्यानुसार त्याला काम करावे लागते. कित्येकदा हे काम त्याच्या भूमिकेविरोधात, मनाविरोधात असू शकते. परंतु एक कलावंत म्हणून त्याला काम नाकारता येत नाही. या चित्रपटातील माझी भूमिका ही मी राजकारणात येण्याआधी चित्रित झालेली आहे. त्यामुळे त्या भूमिकेचा माझा राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये" असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात जर माझ्या पक्षाने वेगळी भूमिका घेतली अथवा चित्रपटाला विरोध दर्शवला तरीही माझा त्याला आक्षेप असणार नाही, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाडांचा विरोध