मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील उर्फ आबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच जडणघडणीत आबांचे असलेले योगदान आणि त्यांची लोकप्रियता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही कायम असल्याची साक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमधून दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "आर. आर. पाटील यांचे महाराष्ट्राच्या मातीशी अतूट नाते होते आणि अखेरपर्यंत ते जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करत राहिले. समस्या मुळाशी जाऊन सोडविण्याची तळमळ, शैलीदार हजरजबाबी वक्तृत्व आणि आपल्या कर्तृत्वाने राजकारणात आपला अमीट ठसा उमटवणारे आर.आर. महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील."
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यासोबतचे जुने छायाचित्र आपल्या ट्विट मधून जारी केले आहे. ते म्हणतात की, "सर्वसामान्य जनतेचे लाडके आबा म्हणजेच दिवंगत आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तळागाळातून वर आलेल्या आबांना सामाजिक प्रश्नांची जाण होती. त्यांच्यासारखा निर्विवाद कणखर नेतृत्व, कुशल प्रशासक व अभ्यासू नेता महाराष्ट्राला लाभणं हे भाग्यच! त्यांचं कार्य कायम स्मरणात राहील.