मुंबई -महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे. त्यानंतर आता तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बहुमत चाचणीत मतदान करण्याच्या परवानगी द्यावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आज ( 29 जून ) सुनावणी होण्याची शक्यता ( deshmukh malik move supreme court permission attend floor test ) आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये या दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे. सध्या हे दोन्ही नेते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी देखील सध्या पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी मिळावी याकरिता सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, अनिल देशमुख आणि नवा मलिक यांना कुठलाही दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे यावेळी त्यांना दिलासा मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्यात आला आहे. राज्यात विद्यमान सरकार अल्पमतात आल्याचे सांगत राज्यपालांनी 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.