मुंबई -आज आर्यनला जामीन मिळेल, अशी अपेक्षा होती, पण एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज नाही तर उद्या यातील ९० टक्के प्रकरणे ही खोटी आहेत हे कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे. मी काही पुरावे गोळा करत आहेत. याच्यातील ९० टक्के प्रकरणी ही कशी तयार करण्यात आली याचे पुरावे आम्ही गोळा करत आहोत.
माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, न्यायाधीशांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही. ज्या प्रकारचा युक्तीवाद करण्यात आला आहे त्यावरही मला आक्षेप नाही. एनडीपीएस कोर्टापासून ते हायकोर्टापर्यंत एनडीपीएस कोर्टाच्या वकिलांचा युक्तीवाद प्रत्येक वेळी बदलतो. ते नव नवीन विषय दरवेळी कोर्टात आणतात. काही लोकांना अडकवण्याचा हा नवीन डाव आहे. असेच बरेच डाव आम्ही पाहिले आहेत. आमच्या प्रकरणामध्ये पाच लाखांपर्यत व्हॉट्सअॅप चॅट दाखवत राहिले. त्याचा उल्लेख चार्जशिटमध्ये नाही. लोकांना जामीन मिळू द्यायचा नाही. माझ्याकडे एक प्रकरण असे आहे ज्यात त्यांनी हा जामीन पात्र गुन्हा आहे असे लिहून दिले आहे. प्रसिद्धीसाठी लोकांना अडकवायचे, जामीन मिळू द्यायचा नाही, याद्वारे दहशत निर्माण करायची, खंडणी वसूल करायची हे या मुंबईमध्ये सुरु आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.