मुंबई - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षाच्या आमदारांची बैठक विधानभवनमध्ये बोलाविली आहे. महाविकासआघाडीला आज बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची विधासभेच्या अधिवेशनासाठी हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महाविकासआघाडी सरकारला आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्याबाबत बोलताना शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या सरकारकडे बहुमत आहे, यात कसलाही संशय नाही.
हेही वाचा-आता मुक्काम पोस्ट 'वर्षा'; लवकरच ठाकरे घेणार मुख्यमंत्री निवासस्थानाचा ताबा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. महाविकासआघाडी सरकारने २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. हे अधिवेशन शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पार पडणार आहे. यामध्ये शनिवारी बहुमत चाचणी तर रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.
हेही वाचा- ठाकरे सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन, उद्याच होणार बहुमत चाचणी
उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार ?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पक्ष सोडून थेट भाजपबरोबर हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांचे बंड शमविण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यश आले. उपमुख्यमंत्रिपदी जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपदी आल्यास कोणत्या नेत्याची नियुक्ती होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.