मुंबई -विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ( Maha Assembly Speaker Election ) उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भामध्ये महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. त्यावर अजूनही खलबत सुरू आहेत. आता विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेण्यापूर्वी सध्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवल हे योग्य पद्धतीने निर्णय घेतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांनी व्यक्त केल आहे. विधान भवनात ते बोलत होते.
निवडणूक प्रक्रिया योग्य की अयोग्य? याप्रसंगी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही मागे वर्षभर विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना विनंती करत होतो. परंतु त्यांनी ती निवडणूक घेतली नाही. उलट पक्षी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने निवडणूक घेता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु आता ही निवडणूक राज्यपालांनी लादलेली असून या संदर्भामध्ये उचित कारवाई सध्याचे विधानसभा उपाध्यक्ष व मागील वर्षभरापासून विधानसभा चालवणारे नरहरी झिरवळ घेतील असं त्यांनी सांगितलं आहे.
आमच्याकडून एकच उमेदवार -विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहिल असल्याकारणाने काँग्रेसकडून यंदा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु काँग्रेसने तसे न करता महाविकास आघाडी एकत्र येत शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना विधान सभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवले आहे. असे जयंत पाटील म्हणाले.