मुंबई - भारतीय जनता पक्षाकडून या आधीही माझ्यावर आरोप झाले आहेत. त्या संबंधीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी आधीही माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. मात्र त्यांच्याकडून केवळ 'शिळ्या कढीला ऊत 'आणण्याचे काम सुरू आहे. किरीट सोमैय्या यांनी याआधीही मुंबईमधली नरिमन पॉईंट येथील मालमत्तेबाबत आरोप केले होते. आजही नाशिकपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. ही मालमत्ता 1980 मध्ये घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. आज मुंबईतील शासकीय निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
या सर्व मालमत्तेसंबंधी मुंबई सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय मध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र तरीही भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा अशाच प्रकारचे जुने आरोप नव्याने करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सर्व प्रकरणावर आधीपासूनच आम्ही न्यायालयीन लढा देत असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले. केवळ आरोप करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असल्याचे भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले किरीट सोमैय्या ?
भाजप नेते किरीट सोमैय्या हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भुजबळांवरती भष्ट्राचाराचे आरोप केले. सोमैय्या म्हणाले, की आर्म स्ट्रॉंग कंपनीत छगन भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ हे मुंबईतील नऊ मजली घरात राहतात. तो कुणाचा आहे ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला. भुजबळांचे घर कुणाचे आहे, हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी मला सांगावे, असे आवाहनही सोमैय्या यांनी केले.