मुंबई -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत सापडले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी लगेचच तिथे असलेल्या सर्व राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री आदिती तटकरे आदी मंत्री उपस्थित होते.
हे ही वाचा -अहंकार बाजूला ठेवा.. काँग्रेस हाच पर्याय, काँग्रेसचा ममता बॅनर्जींवर पलटवार
देशात मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष योग्यरित्या काम करत नाही. त्यामुळे होणार्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी मजबूत तिसरी आघाडी देण्याची गरज आहे. मात्र ही तिसरी आघाडी काँग्रेस व्यतिरिक्त असावी, असं मत प्रसारमाध्यमांसमोर ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी कोणालाही न वगळता, सर्वांना सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा केली जाईल, अशी सारवासारव केली. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने पाठबळ दिले आहे. असा असताना थेट शरद पवार यांची भेट घेऊन ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल नाराजी निर्माण करणारी आहे.