मुंबई -गेले दीड वर्ष रखडलेल्या देवस्थान आणि महामंडळाच्या वाटपास महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने आज मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत शिर्डी देवस्थान राष्ट्रवादी तर पंढरपूर देवस्थान काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थानाचे अध्यक्षपदा शिवसेनेकडे कायम राहील, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नियुक्त्यांबाबतचे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. बैठकीनंतर बोलताना शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महामंडळ वाटपसंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे. तीन पक्षांना लवकरच महामंडळाचे वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणे वाटप होईल. छोट्या घटक पक्षांना यात वाटा दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा-CBSE ICSE Class 12 Exams मुल्यांकनाचे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले सर्व आक्षेप
महाविकास आघाडीला मिळणार बळ
मंत्रीपद न मिळालेल्या तसेच विधानसभा उमेदवारी न मिळालेल्या नाराज नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारला महामंडळाचा मोठा आधार असतो. राज्यात ५० पेक्षा अधिक महामंडळे आहेत. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य अशी नेते व कार्यकर्ते यांची वर्णी लावली जाते. तसेच सरकारला सामाजिक कामांमध्ये आर्थिक मदतही महामंडळे करत असतात. मात्र गेल्या दीड वर्षांपासून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. अखेर पहिल्यांदा साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसकडे देण्यात आले आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने शिर्डी देवस्थानवर हक्क सांगितला होता.