मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यातील आर्थिक, सामाजिक घडामोडींसह सध्य परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीची ही आढावा बैठक पार पडली.
राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळ, मुसळधार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः राज्यातील अनेक भागात भेटी देऊन कोरोनाची परिस्थिती जाणून घेत आहेत. तसेच पक्षाच्या मंत्री, आमदार पदाधिकारी यांना देखील त्यांनी प्रत्येक जिल्हा विभागवार पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सर्व बाबतीत पवार यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली.
कोरोनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेलफेअर ट्रस्टकडून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना मदत पोहोचवण्याचे काम करण्यात आले. त्यासोबतच आरोग्य सुविधा आणि मागील काही दिवसात कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळा दरम्यान नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांसाठीही मोठी मदत करण्यात आल्याची माहिती या आढावा बैठकीदरम्यान पवारांना देण्यात आली.
पवार यांनी यावेळी शहरी भागात सोबत ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांचे प्रश्न यावर सर्वांनीच अधिक लक्ष देऊन काम करावे, अशा प्रकारच्या सूचना केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या आढावा बैठकीस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगार मंत्री दिलीप वळसेपाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.