मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त बेलॉर्ड पिअर येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला. प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यालयाबाहेर पदाधिकारी, मंत्री यांनी गर्दी करू नये, यासाठी खास खबरदारी घेण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण; राज्याला उभारी देण्यासाठी काम करण्याचे आवाहन - जयंत पाटील न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित होण्याचा निर्धार करावा. रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा कोरोना महामारी आणि नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. कोणताही मोठा कार्यक्रम न घेता महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित होण्याचा निर्धार करावा. रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज सायंकाळी जयंत पाटील कार्यकर्त्यांना फेसबूक लाईव्हवरून मार्गदर्शन करणार आहेत.
ध्वजारोहण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खा. सुप्रिया सुळे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.