मुंबई -मुंबईमध्ये पहिल्यांदाच गेल्या महिनाभरात पेट्रोल शंभरी पार झाले आहे. गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. महागाई सतत वाढत आहे. ही भाववाढ कमी न केल्यास आजच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन भाजपा कार्यलयासमोर करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
'आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात'
पेट्रोल आणि डिझेलची सतत दरवाढ होत आहे. एकीकडे महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असताना पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सतत होत आहे. नुकतेच केंद्र सरकारने गॅसच्या दरात वाढ केली आहे. महागाई आणि वाढत्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या आदेशानुसार आज मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'...अन्यथा भाजपा कार्यालयासमोर आंदोलन'
आज नागरिकांचे महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदाच पेट्रोल शंभरीपार गेले आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहेत. महागाई कमी करावी, पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत म्हणून आज दक्षिण मुंबई जिल्ह्याच्यावतीने क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आम्ही मोजके लोक येथे जमलो आहोत. केंद्र सरकारने याची वेळीच दखल घ्यावी आणि महागाई कमी करावी अन्यथा भाजपा कार्यालयाच्या समोर आंदोलन करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांनी दिला आहे.