मुंबई - रिपब्लिक भारत टीव्ही संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संवाद समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अर्णब गोस्वामी याला अटक करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिक भारतच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. भाजपाला थोडी तरी लाज असेल देशद्रोही अर्णबला पाठीशी घालणे सोडावे, त्याला अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
'गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली?'
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीला घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांवरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली, हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादीने आज रिपब्लिक भारतच्या कार्यलयाबाहेर निदर्शने केली.
'देशद्रोही अर्णबबाबत एक चक्कारसुद्धा काढायचा नाही?'
देशाची अत्यंत गोपनीय माहिती अर्णबला मिळाल्यानंतर आपल्या चॅनलचा टीआरपी वाढला, त्यांनी जल्लोष साजरा केला. अर्णब देशद्रोही आहे. तो मुंबईतून पळून गेला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र त्याला सोडविण्याचे काहींनी प्रयत्न केले आहेत. त्याला अटक करण्याची जवाबदारी आता गृहमंत्री अमित शाह यांची आहे. तांडव चित्रपटासाठी तांडव करायचा, मात्र देशद्रोही अर्णबबाबत एक चक्कारसुद्धा काढायचा नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र देणार आहोत. मात्र मुंबई पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली होती. अमित शाह यांनी अर्णबला पाठीशी घालू नये. अर्णबला अटक झाल्यानंतर आंदोलन करणारे भाजपा नेते आता कुठे आहेत, असा सवालही चव्हाण यांनी भाजपाला केला आहे.