मुंबई :राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस बजावण्यात आल्याने वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवी मुंबईतील वाशी पाम बीच रोड परिसरात असणाऱ्या सद्गगुरु बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचा निशाणा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी साधला होता. त्यानंतर त्या बारचा परवाना आपल्या नावे असल्याचा खुलासा समीर वानखेडे यांनी केला होता. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस वानखेडे यांना बजावली आहे. या नोटिसीवर वानखेडे यांना त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे.
सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून हा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर
समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये (IRS) रुजू झाल्यापासून बारचा परवाना त्यांच्या नावे असल्याचे वानखेडे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. या बार संदर्भात असणारे कायदेशीर हक्क समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवाय कायदेशीर परवाना असल्याने यात बेकायदेशीर असं काहीच नाही, असेही समीर यांचे म्हणणे आहे. समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये २००६ सालापासून रुजू झाले. तेव्हापासूनच हा परवाना समीर यांच्या नावे आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख समीर यांच्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये देखील आहे, असेही स्पष्टीकरण त्यांनी यापूर्वीच दिलंय.
समीर यांच्या नावे परवाना असलेला बार वाशीत
समीर वानखेडे यांच्या मालकीचा सद्गगुरु बार आणि रेस्टॉरंट हा बार नवी मुंबईमधील वाशी येथील पाम बीच रोड (Palm Beach Road) लगत आहे. हा परिसर नवी मुंबईतील अंत्यत महागडा परिसर आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार वाशीमधील सद्गगुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावाचा असून तो २७ ऑक्टोबर १९९७ ला त्यांना जारी करण्यात आला आहे. हा परवाना वेळोवेळी रिन्यू करण्यात आला आहे व ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गगुरु बारमध्ये देशी व परदेशी दारुची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.