मुंबई -क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. आज एनसीबीची टीम शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दाखल झाली होती. चौकशीसाठी ही टीम आली असल्याची चर्चा होती. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीची टीम तिथे गेली असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज सकाळीच शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच एनसीबीची टीम 'मन्नत'वर दाखल झाली होती.
हेही वाचा -NCB पथक शाहरुखच्या 'मन्नत'वर; पेपर वर्कसाठी गेल्याचे समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण
- 'मन्नत'वरील कारवाईवर एनसीबीचे स्पष्टीकरण -
शाहरुखच्या बंगल्यामधून बाहेर आल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आम्ही कागदपत्रांच्या कामासाठी येथे आलो होतो. आम्ही काहीही शोधाशोध केली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शाहरुखच्या घरी एनसीबीने छापा टाकला नाही हे स्पष्ट झाले आहे. आर्यन खानच्या अटकेप्रकरणी काही नोटीस आणि इतर कायदेशीर कागदोपत्री गोष्टींच्या पूर्ततेसाठी अधिकारी मन्नतवर गेले होते, असे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे वांद्रे येथे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीने छापा टाकला. एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी दुपारी मुंबई एनसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या छाप्याचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनन्या ही बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- तीन आठवड्यांनी दहा मिनिटांची भेट -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र, प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाहरुख खानला मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणं झालं. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसेच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
हेही वाचा -अभिनेत्री अनन्या पांडे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयाकडे रवाना